भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून या माध्यमातून उबाठाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर समाधान महाजन हे देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत जातील असे मानले जात होते. तथापि, त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची धुरा देखील सोपविण्यात आली. तथापि, स्थानिक पातळीवर अनेकदा अंतर्गत कलह उफाळून आल्याचे मध्यंतरी दिसून आले होते. यामुळे समाधान महाजन अस्वस्थ झाल्याचे दिसत होते. या अनुषंगाने त्यांनी काल रात्री दीड वाजेच्या सुमारास शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समाधान महाजन यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तर लक्षणीय बाब म्हणजे समाधान महाजन यांची शिवसेनेच्या रावेर लोकसभा जिल्हाप्रमुखपदी तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे शिवसेना-उबाठा पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.