धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावातील हॉटेल सायलीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात मालवाहू वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर बाबुराव चावडे (वय-६५, रा.सतखेडा ता. धरणगाव) असे मयत झालेल्या दुचाकीस्वार वृद्धाचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सातखेडा येथील राहणारे मधुकर बाबुराव चावडे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवार २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता ती त्यांची दुचाकी (एमएच १५ एटी ८४५८) ने धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावातील हॉटेल सायलीजवळून जात असतांना त्यावेळी त्यांच्या मागे येणारी मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ एस ९४८१) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मधुकर चावडे हे जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी मालवाहू वाहनावरील चालक रवींद्र देविदास बारी रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी हे करीत आहे.