मुक्ताईनगर-पंकज कपले | आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरातील चकर्या आणि भोवर्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दोन दिवसांपासून हे धंदे बंद झाले असले तरी पत्त्यांचे क्लब सुरूच असल्याने ते नाथाभाऊंना जुमानत असल्याचे दिसून आले आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत सोमवारी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांचा पाढा वाचून दाखविला. यात त्यांनी मुक्ताईनगरात गल्लोगल्ली चकर्या आणि भोवरे यांच्यासह पत्त्यांचे क्लब आणि सट्टा खुलेआम सुरू असल्याचा आरोप केला. या सर्व अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या संदर्भात आपण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५२ पत्रे पाठविल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला. यावर फडणवीस यांनी पलटवार करत तक्रार म्हणजे पुरावा नव्हे, असे सांगत नाथाभाऊंनी पुराव्यांसह तक्रारी कराव्यात असे आवाहन केले.
दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर स्थानिक पातळीवर याचे मोठे पडसाद उमटले. यात चकर्या आणि भोवरे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगाराला दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. याच्या सोबतीला सट्टा देखील बंद करण्यात आलेला आहे. असे असले तरी पत्त्यांचे मोठे क्लब हे अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हे क्लब नाथाभाऊंच्या रेंजच्या बाहेरचे आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुक्ताईनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणासह पुरनाड फाट्यावरील क्लब अजून देखील सुरूच असून यात सर्वपक्षीय पदाधिकार्यांचे हात ओले होत असल्याची जनतेमध्ये चर्चा आहे.
यासोबत, एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत अवैध धंद्याचंा प्रश्न उपस्थित केल्यानंतर दोन दिवसांपासून चकर्या आणि भोवरे तसेच सट्टा बंद झाला असला तरी क्लबच्या सोबतच अवैध गुटखाच्या व्यवसाय देखील सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे पाच वाजता शहरातील मुख्य चौकात एक इनोव्हा गाडीतून अवैध गुटख्याची खेप आल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला मिळाली. यामुळे पत्रकारांना घेऊन तेथे गेले असता संबंधीत वाहन रफुचक्कर झाल्याचे दिसून आले. यामुळे अवैध गुटख्याला नेमके पाठबळ कुणाचे ? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून लावत अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी होत आहे.