नवी दिल्ली-वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, पहिल्याचा दिवशी सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून, त्यांना केंद्राने तत्काळ मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.
दरम्यान लोकसभेत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, महाराष्ट्र आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहे. काही जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नाही. त्यामुळे अशाठिकाणी कोरडा दुष्काळ पडला आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला असल्याच्या सुळे म्हणाल्या आहेत.