सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथील सातपुडा विकास मंडळच्या वतीने स्व. सुनितभाई बोंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रार्थना सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्व. सुनीत भाई बोंडे हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले प्रमुख व सातपुडा विकास मंडळाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आदिवासी भागामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली व समाजबांधवांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा एक सच्चा प्रयत्न केला. तसेच या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतातील सर्वश्रेष्ठ जमनालाल बजाज पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. स्वर्गीय सुनित भाई बोंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी पुष्पांजली अर्पण करून मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये भविष्यकाळात होणारे बदल लक्षात घेऊन कृषी शिक्षणाची गरज सर्व शाळा व महाविद्यालय वर्गातील विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यासाठी चा महत्त्वपूर्ण निर्णय घेणे महत्वाचे आहे असे सूतोवाच केले. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत शेतकऱ्यांसाठी रानभाजी माहिती पुस्तिकेचे विमोचन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आजच्या या दिवसाचे अवचित्य साधून भारताचे महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची १०६ वी जयंतीनिमित्त मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केले. तसेच प्रक्षेत्रावर बांबू म्युझियमची निर्मिती करून नवीन वाणांची बांबू लागवडीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम डॉ. अरुणाताई चौधरी व अजित पाटील व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, धनंजय भाऊ चौधरी,प्रभात दादा चौधरी, प्रशांत बोंडे, श्रीमती विजाताई बोंडे,पाल गावातील ग्रामस्थ व सर्व कार्यकर्ता परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.