धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणी शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करतांना जप्त केलेले ट्रॅक्टर पळूवन नेल्याची घटना शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूक करण्यास कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतांना धरणगाव तालुक्यातील आव्हाणे गावानजीकच्या गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे ट्रक्टर धरणगाव महसूल पथकातील मंडळाधिकारी अविनाश पाटील यांच्या पथकाने शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कारवाई करत पकडले होते.
त्यावेळी जप्त केलेले ट्रॅक्टर हे धरणगाव तहसील कार्यालयात नेत असतांना ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाने मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेवून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर मंडळाधिकारी अविनाश पाटील यांनी रविवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक आणि मालक अक्षय पाटील रा. पाळधी ता.धरणगाव या दोन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.