राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होणार रावेर तालुक्यातील कृषी केंद्र चालक !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील कृषी केंद्र चालक २ ते ४ नोव्हेंबरच्या दरम्यान आपापली दुकाने बंद ठेवणार असून या संपात तालुक्यातील चालक सहभागी होणार असून या संदर्भात आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

 

रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते बांधवांची बैठक संपन्न झाली. त्यात दिनांक०२ नोव्हेंबर ते ०४ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी कृषी विक्रेत्यांचा बंद मध्ये सहभागी होऊन तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांची दुकाने तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भातील निवेदन आज रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले. यासोबत तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.

गेल्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी  कृषीविषयक सुधारणांमध्ये नव्या कायद्याचं आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली नवीन कृषी विधेयके ज्या विधेयक क्रमांक ४० ते ४४ या दरम्यान असलेल्या विधेयकांमध्ये दिलेल्या शिक्षेच्या तरतुदी विषयी व एमपीडीए सारख्या गंभीर गुन्हेगारी वृत्तीचा संदर्भ दिला असल्याने कृषीविक्रेत्यांचा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर रोष आहे.

 

त्या अनुषंगाने राज्यातील माफदा संघटनेतर्फे दिनांक ०२ नोव्हेंबर ते ०४ नोव्हेंबर दरम्यान ७० हजार कृषी विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद पुकारला असून  रावेर तालुक्यातील सर्व विक्रेतेही संघटनेच्या माध्यमातून आपली दुकाने बंद ठेवणार असल्याने तिन्ही ठिकाणी निवेदन देण्यात आली. यासोबतच तालुक्यातील १६० विक्रेत्यांनी निवेदनावर सह्या देऊन त्या बंदमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली. हा बंद तालुक्याप्रमाणेच राज्यभरात राहणारा होणार असून या बंदमुळे शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये त्या अनुषंगाने दिनांक ०१ नोव्हेंबर पर्यंत कृषी विक्रेत्यांनी शेतकर्‍यांना सेवा दिली जाणार असून शेतकर्‍यांनी त्या पुढील शेती विषयक कामांचं नियोजन करून आधीच त्याची खरेदी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

 

यावेळी रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे,सचिव युवराज महाजन, उपाध्यक्ष एकनाथ महाजन, एकनाथ पाटील,सुनील पाटील,राहुल पाटील गुरुजी, चंद्रकांत शेठ अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश महाजन, डॉ जी एम बोंडे, विकास पाटील,श्रीपाद जंगले,स्वप्नील पाटील,प्रकाश चौधरी,चेतन महाजन,योगेश आस्वार, यांसह तालुका भरातून कृषी विक्रेते उपस्थित होते.

Protected Content