जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टॉप जवळ नशिराबाद येथील तरूणाला शिवीगाळ व मारहाण करत गळ्यातील ९७ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन ओढून नेल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे भूषण हिरालाल चौधरी (वय-३१) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव रेल्वेस्थानकासमोरील रिक्षा स्टॉप येथे आलेला होता. त्यावेळी चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे यांनी कारण नसतांना भूषण चौधरी याला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ९७ हजार रूपये किंमतीची तीन तोळ्याचे सोन्याची चैन जबरी हिसकावून पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर भूषणने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे दोन्ही रा. नशिराबाद ता.जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बशिर तडवी करीत आहे.