दुचाकीस्वाराचा रस्ता आडवून मारहाण करत लुटणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या शिपाई हा दुचाकीने घरी जात असताना तीन जणांनी रस्ता अडवून त्याला बेदम मारहाण करत त्याच्या जवळील मोबाईल आणि ९ हजार रुपयांची रोकड असा १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवार १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे राहणारा मयूर अशोक बोरे वय-३० हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून तो मुक्ताईनगर येथील एका बँकेत शिपाई पदावर नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी मयूर बोरे हा कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने रात्री ९.३० वाजता निघाला होता. त्यावेळी मुक्ताईनगर ते घोडसगाव दरम्यानच्या रस्त्यावर तीन जणांनी त्याचा रस्ता अडविला. त्यानंतर तिघांनी त्याला दुचाकी वरूनखाली पाडत त्याच्या जवळील मोबाईल व रोकड हिसकावून बेदम मारहाण केली व दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान मयूरने हा प्रकार मित्रांना सांगितला. त्यानुसार त्याचे मित्र घटनास्थळी हजर झाले. मयूर आणि त्याचे मित्रांनी तिघांचा पाठलाग केला. दरम्यान मारहाण करणारे हे तिघे चिखली गावाच्या ब्रिजजवळ दिसून आले. त्यावेळी तिघांनी मयूर व मयूरच्या मित्रांना पाहताच पुन्हा दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, दरम्यान त्यांचा पाठलाग सुरू असताना पुढे रस्ता संपल्याचे लक्षात आल्यानंतर तिघेजण दुचाकीवरून खाली पडले. यातील दोन जण पसार झाले तर एकाला जागीच पकडले. त्याचे नाव गाव विचारले असता राज उर्फ बाळा विजय वाकोडे रा.रामपेठ वरणगाव असे सांगितले. आणि त्याचे सोबतचे फरार झालेले संशयित आरोपी वैभव तायडे व सोनू भालेराव दोन्ही रा. रामपेठ असे नाव सांगितले. दरम्यान पकडलेल्या राज उर्फ बाळा वाकोडे याला मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी तिघां विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content