मिरवणूकीत तरूणाला धक्काबुक्की करत दोघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नवरत्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीमध्ये नाचत असताना वाद होऊन आनंद श्रीकृष्ण जंजाळे ऊर्फ नाव नाऱ्या (२६, रा. विवेक कॉलनी) यांना दोन जणांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता संभाजीचौकात घडलीय. या प्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  आनंद जंजाळे हे रविवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास संभाजी चौकात दुर्गा देवी मिरवणुकीत नाचत असताना आकाश राठोड (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. समतानगर याने मुद्दामहून धक्काबुक्की केली. त्यावर दोघांमध्ये वाद झाला. थकल्यामुळे जंजाळे हे एका किराणा दुकानाजवळ बसले होते. तेथे आकाश सोबत असलेला देवा राठोड (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. समतानगर आला व दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तू आमच्या नांदी का लागतो असे म्हणत तुला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यात आकाशने लाकडी दांड्याने उजव्या कानावर, डोक्यावर मारून दुखापत केली तर देवाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

जखमी अवस्थेतील जंजाळे यांना त्यांचे मित्र संजू सुरवाडे व दिनेश बोदडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमीने मंगळवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content