जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेला नवकिसान बायो प्लांटेक लि, हैद्राबाद व नवभारत फर्टीलायझर्स या कंपनीचे अनधिकृत खतांचा साठा कृषी विभाग व अमरावती पथकाने जप्त केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक गावातील विकास सोसासटीच्या गोडावूनमध्ये अनधिकृतपणे खतसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जळगाव जिल्हा कृषी विभाग व अमरावती येथील पोलिसांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यात नवकिसान बायो प्लांटेक लि, हैद्राबाद व नवभारत फर्टीलायझर्स च्या खतांचा विनापरवाना उत्पादन ,साठवणूक व विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर ,कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील विजय पवार, जिल्हा मोहीम अधिकारी यांनी फिर्याद दाखल केली. तर तपासणी पथकातील धीरज बडे, अमरावती पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुनिल सोळंके, सहायक निरीक्षक पंकज तायडे, नरेंद्र वानखेडे या तपासणी पथकाच्या सदस्यांनी संशयित गोदामात साठवणूक केलेल्या साठा जप्त करून संशयित मालाचे नमुने घेतले व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 खत नियंत्रण आदेश 1985 नुसार अधिकृत खताची उत्पादन विक्री साठवणूक करणाऱ्या उत्पादक जबाबदार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.