बोदवड-सुरेश कोळी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याला जोडणार्या उड्डाणपुलास खुला केल्यानंतर काही तासांमध्येच हा पूल पुन्हा अडथळे टाकून बंद करण्यात आल्याने मोठा पेच निर्माण झाला असून आमदारांनी पुन्हा पुलाकडे धाव घेत याला नव्याने सुरू केले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, बोदवड आणि मुक्ताईनगरच्या मध्ये नाडगाव येथे रेल्वे स्थानकावर उड्डाणपुलाचे काम कधीपासूनच सुरू आहे. या कामामुळे या रस्त्यावरील वाहतुकीची अनेकदा कोंडी होत असते. विहित मुदत संपून गेल्यावर देखील पुलाचे काम सुरू न झाल्यामुळे येथून ये-जा करणार्यांची मोठी कुचंबणा होत असते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आधीच या पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने किरकोळ कामांसाठी जनतेला वेठीस न धरता याला तात्काळ जनतेसाठी खुला करावा असे निर्देश देखील दिले होते. तथापि, रेल्वे प्रशासनाने पूल खुला केला नाही.
दरम्यान, आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी विविध एक्सप्रेस गाड्यांना बोदवड रेल्वे स्थानकावर आधीप्रमाणेच थांबा मिळावा या मागणीसाठी रेल्वे रोको आंदोलन केले. यानंतर ते आपल्या सहकार्यांसह थेट उड्डाण पुलावर चढले. त्यांनी या पुलावर टाकलेले अडथळे हे जेसीबीच्या सहाय्याने दूर करून हा पूल जनतेसाठी खुला केला. अर्थात, आजपासून या पुलावरून नियमीत वाहतुक सुरू झाली. यामुळे अर्थातच परिसरातील जनता सुखावली. मात्र काही तासांमध्येच यात पुन्हा ट्विस्ट आला. रेल्वे प्रशासनाने या पुलावर पुन्हा एकदा मोठे अडथळे टाकून हा पूल बंद केला.
याची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बोदवड रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. त्यांनी हा पूल पुन्हा एकदा खुला करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. कुणा एका व्यक्तीने आपले महत्व अबाधित रहावे म्हणून हा पूल पुन्हा बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर कुणी तरी कॉल करून भुसावळच्या डीआरएम कार्यालयातून सूत्रे हलविल्याचे ते म्हणाले. अर्थात, पूल खुला न केल्यास येथे आताच मोठे आंदोलन उभारण्याचा पवित्रा देखील त्यांनी घेतला. यानंतर त्यांनी दुपारी तीन वाजता हा पूल पुन्हा खुला केला. यावरून आता सर्व वाहतुक सुरू झालेली आहे. यामुळे आता हा रेल्वे उड्डाण पुल राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा केंद्रबिंदू बनल्याचे दिसून आले आहे.