जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सासूचे निधन झालेले असल्याने मालेगाव येथे कुटुंबासह गेलेल्या जिजाऊ नगर येथील प्रकाश खैरनार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने मिळून एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविलयाची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ३१ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्लायवूडचे व्यावसायिक असलेले प्रकाश खैरनार यांच्या सासूंचे २९ जुलै रोजी रात्री निधन झाले. त्यामुळे खैरनार कुटुंबीय रात्री ११ वाजता मालेगाव येथे गेले. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. ३० रोजी सकाळी शेजारील महिलेला खैरनार यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी या विषयी माहिती दिली. सोबतच पोलिसांनाही या विषयी माहिती देण्यात आल्याने तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार, पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, दिनेश पाटील, उमेश ठाकूर, अनिल फेगडे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहणी करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही बोलवून घेतले. मात्र घरमालक बाहेर गावी असल्याने नेमका किती मुद्देमाल गेला, हे समजू शकत नव्हते. खैरनार कुटुंबीय ३० रोजी रात्री घरी परतले त्यावेळी पाहणी केली असता घरातील २० हजार रुपये रोख, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, ५ चांदीचे शिक्के, २०० ग्रॅम वजनाची महालक्ष्मी मातेची मूर्ती असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आहे. या प्रकरणी खैरनार यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.