जळगावच्या तरुण डॉक्टरची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश नगरातील रहिवासी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने केईएम हॉस्पिटल येथे विषारी इंजेक्शन घेऊन ऑनड्युटी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ३१ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. डॉ. आदिनाथ संजय पाटील (२७, रा. जळगाव, गणेश नगर) असे मयत झालेल्या तरुण डॉक्टरचे नाव आहे

मुंबई येथे वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या डॉ. आदिनाथ पाटील हा केईएम रुग्णालयाच्या औषधविभागशास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तो डॉ. संजय पाटील व डॉ. स्मिता पाटील यांचा चिरंजीव आहे. सोमवारी ३१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले.

काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील महिला आणि पुरुषांचा वॉर्ड शिवडी टीबी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला आहे. त्यानंतर, आदिनाथ दोन्ही ठिकाणी उपचार करीत होता. रविवारी ३० जुलै रोजी रात्री तो ऑनड्युटी होता. रात्री एका रुग्णाच्या इकोसाठी तो केईएममध्ये आला होता. रात्री त्याने रजिस्टार सोबत जेवण देखील केले. मात्र, पुन्हा परतल्यानंतर रात्री शिवडी टीबी रुग्णालयात इंजेक्शन घेवून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ओपीडीला न आल्याने त्याच्यासोबतच्या डॉक्टरांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने, दरवाजा उघडला नाही म्हणून परिचारिकेने मागच्या बाजूने दरवाजा उघडला. तेव्हा तो मृतावस्थेत आढळला. अत्यंत हुशार आणि हसमुख विद्यार्थी अशी आदिनाथची ओळख होती. नीट परिक्षेतदेखील त्यांनी जिल्ह्यात स्थान मिळविले. त्याचा भाऊदेखील केईएममध्ये शिकत असल्याची माहिती मिळाली.

Protected Content