‘निम्न तापी’ प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा द्या : आ. सत्यजित तांबे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.

 

निम्न तापी पाडळसे प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे दरवर्षी १० हजार दशलक्ष घनमीटर पाणी येथून वाहून जात आहे. हा प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे 54 हजार 936 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून अलिप्त राहिले आहे. या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी जळगाव परिसरातील ग्रामस्थांनी शासनाकडे वेळोवेळी केली आहे. त्यानुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाने अशाप्रकारचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

 

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावातील श्री रोकडेश्वर सहकारी उपसा सिंचन योजना क्रमांक एक या संस्थेसाठी ऊर्जा निर्मिती व एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्याकरिता सव्वा दोन कोटीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी सत्यजित तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. या संस्थेला महावितरण कडून फक्त आठ तास वीज पुरवली जाते. मात्र हा वीज पुरवठा अत्यंत कमी असल्यामुळे या ठिकाणी एक्सप्रेस लाईन टाकणे व सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे गरजेचे असल्याचे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content