जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून ज्ञानदेव मोतीराम पाटील (60, रा.आसोदा) या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानदेव मोतीराम पाटील हे असोदा येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहायला होते. जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर ते सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाचा जळगाव शहराला जोरदार तडाखा बसला. पाऊस सुरू असताना पाटील हे ड्युटी संपवून घराकडे निघाले होते. महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळून सायकलीवरून जात असताना पावसाच्या तडाख्याने अचानक जिनिंगची भिंत कोसळली. त्याभिंतीच्या ढिगाराखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार आजू-बाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच त्यांना ढिगा-याखालून बाहेर काढले. जळगाव शासकीय महाविद्यालय जिल्हा रूग्णालयात नेले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.