जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील एलजीव्ही, एचजीव्ही, टॅक्सी, एचपीव्ही, एमपीव्ही वाहनांची नविन नोंदणी एमएच-१९/ ईई -०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.
ज्या वाहनधारकांना आपल्या नवीन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी कार्यालयात २४ व २५ एप्रिल, 2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज जमा करावा. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. आकर्षक क्रमांकाची पावती प्राप्त झाल्यावर सदरची पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेसाठी देणे बंधनकारक आहे. या पावतीची विधीग्राह्यता ही फक्त ३० दिवस असते.
याकरीता दिनांक २४ व २५ एप्रिल रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. २५ एप्रिल रोजी अर्जाची छाणनी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत २६ एप्रिल रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. २६ एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजता बंद लिफाफा सहा/उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे समक्ष उघडण्यात येईल व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदरचा क्रमांक बहाल करण्यात येईल व उर्वरित अर्जदारांचे धनादेश परत करण्यात येतील. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.