चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन पैसे जास्त मिळावे म्हणून अनेक शेतकरी आपला कापूस बाहेरच्या जिल्ह्यातील अनोळखी व्यापाऱ्यांना विकतात, मात्र याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांचा कापूस मोजताना काटा मारला जातो व त्यात मोठी फसवणूक शेतकऱ्यांची होते. असाच एक फसवणूकीचा प्रकार आज लोंजे येथील शेतकऱ्यांच्या सजगतेने उघडकीस आला. क्विंटल मागे ३० ते ३५ किलो चा काटा मारून शेतकऱ्यांचा माल धुळे जिल्ह्यातील मूकटी येथील व्यापाऱ्याकडून विकत घेतला जात होता.
लोन्जे मुन्ना साहेबराव चव्हाण या शेतकऱ्याने आपला ४० क्विंटल कापूस वेचणीच्या वेळी मोजून घरात ठेवला होता. गावात आलेल्या मूकटी येथील व्यापाऱ्याने तो कापूस ७८०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केला असता त्याचे केवळ ३० क्विंटलच वजन आले. सबंधित व्यापाऱ्याने मोजलेल्या मालाची रक्कम देखील शेतकऱ्याला तात्काळ दिली.
मात्र आपला ४० क्विंटल कापूस ३० क्विंटल आला म्हणजे जवळपास १० क्विंटल घट आल्याने शेतकऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गावातील सरपंच व इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब शेतकरी मुन्ना चव्हाण याने आणून दिली असता त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला याचा जाब विचारला तसेच झालेल्या प्रकाराची माहिती मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिली.
त्यांनतर आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तोपर्यंत संबंधित व्यापारी हा तिथून फरार झाला होता. ४० किलोच्या एका तोल मागे १० ते १२ किलो कापूस म्हणजे एका क्विंटलमागे ३० ते ३५ किलो जास्त कापूस मोजला जात असल्याचे आमदार चव्हाण यांना प्रथमदर्शनी निदर्शनास आले. तद्नंतर आमदारांनी सदर शेतकऱ्यांसोबत तो मोजलेला कापूस, गाडी असा मुद्देमाल घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना सदर गंभीर घटनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना लुटणाऱ्याना सोडणार नाही, सिंडीकेट उघडकीस आणणार – आमदार मंगेश चव्हाण
सदर प्रकार अतिशय गंभीर असून अस्मानी संकटांचा सामना करत असताना आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काही भामटे व्यापारी अश्या पद्धतीने लुटत आहेत. हा केवळ एका व्यापाऱ्याचा किंवा एका शेतकऱ्याचा विषय नसून हे मोठे सिंडिकेट आहे, काटा मारलेला कापूस मोजण्यासाठी आदिवासी समाजातील गरीब मजुरांना कामावर घेतले जाते तसेच ज्या गाडीत कापूस भरला जातो ती गाडी देखील भंगार स्वरूपातील वापरली जाते. यात काही जिनिंग वाले देखील सहभागी आहेत. त्यामुळे या सर्व सिंडिकेट चा सविस्तर तपास करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.
तसेच शेतकऱ्यांनी शक्यतो विश्वासातील व्यापाऱ्यांनाच आपला माल विकावा तसेच कापूस मोजताना ताणकाटा ऐवजी इलेक्ट्रॉनिक काटा वापरण्याचा आग्रह धरावा. तालुक्यातील इतर अनेक शेतकऱ्यांची देखील फसवणूक झाली असून ते पिडीत शेतकरी देखील तक्रारी घेऊन पुढे येतील. त्यांच्या फिर्यादी स्वतंत्रपणे दाखल करून घेत त्यांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी अश्या सूचना पोलीस निरीक्षक यांना केली. यात कितीही मोठा व्यापारी अथवा व्यक्ती असला तर्री शेतकऱ्यांना लुटणाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.