रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बनावट अपंगत्व प्रकरणी गुन्हा दाखल असतांनाही आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव अखेर वगळण्यात आले आहे.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्राप्त ठरवलेले रावेर तालुक्यातील ग्रामसेवक रविंद्रकुमार चौधरी यांना निवड यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्यावर बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतल्यामुळे गुन्हा दाखल आहे. यामुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामसेवकाची निवड रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर आली आहे.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी रवींद्रकुमार चौधरी यांची शिफारस रावेर पंचायत समितीने केली होती. मात्र ग्रामसेवक चौधरी यांच्या विरुध्द बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीसाठी लाभ घेतल्याबाबत येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी याबाबतचा अहवाल तातडीने पंचायत समितीकडून मागवला होता. प्राप्त अहवालानुसार पात्र ठरविण्यात आलेले ग्रामसेवक चौधरी यांची आदर्श पुरस्कारासाठी झालेली निवड स्थगित करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच चर्चेला उधाण आले आहे.