जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव महानगरपालिकेसमोर गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करून प्रतिमेला काळे फासून निषेध केला. तर त्याच ठिकाणी त्याच वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी भाजपच्या नगरसेवकांविरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलनाने जळगावकरांचे लक्ष वेधले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रावण हा श्रीराम पेक्षा श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य केल्याने महासभेत गोंधळ उडाला. उपमहापौरांच्या वक्तव्याचा भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपमहापौर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महापालिकेसमोर प्रतिकात्मक फोटोला काळेफासून निषेध व्यक्त करण्यात आला. तर दुसरीकडे त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्त्यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समर्थन देत भाजपच्या नगरसेवकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी भाजप पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेविकास सुचिता हाडा, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिक कार्यकर्ते उपस्थित होते तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे, महिला जिल्हाध्यक्ष मंगला बारी, मनीषा पाटील, अमित जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.