जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सर्पदंश,उष्णता अथवा थंडीची लाट, हिमबाधा, आघात अथवा भाजणे अशा आपत्तींमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घेवून प्रथमोपचार केले पाहिजे याचे धडे एनडीआरएफच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी रासेयो स्वयंसेवकांना दिले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारपासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर सुरू झाले आहे. राज्याच्या २० विद्यापीठांमधील ८५६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. एनडीआरएफच्या ५० तज्ज्ञाकडून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. शिबिराच्या चौथ्या दिवशी म्हणजे गुरूवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या ठिकाणी या तंज्ज्ञानी पूर बचाव यंत्रेणे बाबतची माहिती दिली व प्रात्यक्षिके दाखवली. आयआरबी बोट व ओबीएम यांच्या हाताळण्याचा परिचय, पूर बचाव तंत्र आणि सुधारित तराफा उपकरणे आणि पोहण्याचे तंत्र व साधनांचा वापर अशा काही विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली व शंकाचे निरसन केले.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे स्वत: सकाळच्या सत्रात मेहरूण तलावावर उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. नितीन तेंडूलकर, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, आव्हानचे समन्वयक प्रा. किशोर पवार, एनडीआरएफचे अनंता बाभूळकर हे उपस्थित होते.
विद्यापीठातील पाच सभागृहांमध्ये दिवसभर विविध पाच सत्रे झालीत. सर्पदंश, विषबाधा, आघात, भाजणे, उष्ण अथवा थंडीची लाट यासारख्या आपत्तींच्या प्रसंगी वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे प्रथमोपचार केले पाहिजे याचे प्रशिक्षण एनडीआरएफचे पुरूषोत्तम राणा, सुशांतकुमार शेट्टी, सर्वेशकुमार उपाध्याय, निलेश जाधव, लालचंद भोसले यांनी दिले. सर्पदंश झाल्यावर जखम स्वच्छ पाण्याने धुवा, रूग्णाच्या अधिक हालचाली होणार नाहीत याची काळजी घ्या. साप हाताला चावला असेल तर दंडाला आणि पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने आवळून घ्या. आघात झालेला रूग्ण असेल तर त्याचे ह्रदयाचे काम आणि रक्तावरचे नियंत्रण कसे ठेवावे याविषयीची शास्त्रशुध्द माहिती दिली. मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर रूग्णाला रूग्णालयात हलवण्यापूर्वी एका व्यक्तीकडून रूग्णावर कशा पध्दतीने उपचार करता येतील याबद्दल ही प्रात्याक्षिकांसह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून देखील प्रात्याक्षिके करून घेण्यात आली.
सायंकाळी वर्धा, एसएनडीटी मुंबई, राहूरी कृषी विद्यापीठ, परभणी कृषी विद्यापीठ, सिंधदूर्ग, पुणे, बीड, परभणी या येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.