शिर्डी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत आज शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असतांना त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत हे आज सहकुटुंब शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार टीका केली. गद्दार आमच्या सारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर हा आमच्या निष्ठेचा विजय आहे. यांना शिव्या देण्याची एवढीच हौस असेल तर राज्यात अनेक प्रकरण घडत आहेत. यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या? असा सवाल त्यांनी केला. तसेच शिव्या द्या. राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या; असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिलं आहे.
राऊत पुढे म्हणाले की, शिव्या कुणाला देताय शिवसैनिकांना. निष्ठावंतांना. जरूर शिव्या द्या. तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. त्यांच्या शिव्यांचा काही परिणाम होणार नाही. हे लोक वेडे झाले आहेत. वेडे लोक आहेत. शिवसेनेत असेही लोक आहेत. ज्यांनी गुडघे टेकवले नाही. आजही लढत आहेत. कितीही चौकश्या झाल्या तरी आम्ही लढणारे लोक आहोत. ही बाळासाहेब ठाकरेंची पार्टी आहे. हा वाघांचा पक्ष आहे. घाबरणार नाही. बंदुकीची गोळी आली तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.