…त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली ! : शिवसेनेची खोचक टिका

मुंबई प्रतिनिधी । बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील जात व प्रांतास महत्व आणले जात आहे. हे असे राजकारणा कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे. महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करत असून त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली असल्याची खोचक टिका आज शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि यानंतर राज्यभरात सुरू झालेल्या आंदोलनांवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, भाजपचे गोपीचंद हे राजकारण वा समाजकारणातील फार मोठे व्यक्तीमत्व नाही. तथापि, फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरूण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केले ते फडणवीस वा त्यांच्या भाजपच्या मन की बात तर नव्हे ना ? हा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे. पवार हे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पॉझिटीव्ह नाही हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतो कुठे ? २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले होते. आणि पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लाऊ हे भाजपचे आश्‍वासन होते हे गोपीचंद कसे विसरले ?

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पवार हे लहान जाती समूहांचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करत असल्याचा गोपीचंद यांचा आरोप आहे. मात्र भाजपनेही गोपीचंद यांचा याचसाठी वापर केला आहे. मोदी देखील या प्रकारच्या राजकारणात तरबेज आहेत. लडाखमधील गलवान खोर्‍यात बिहार रेजीमेंटने शौर्य गाजविल्याचे मोदींना सांगितले आहे. मग आजवर देशावर संकटे आली तेव्हा मराठा, डोग्रा, शीख, राजपूत, महार रेजीमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय ? बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील जात व प्रांतास महत्व आणले जात आहे. हे असे राजकारणा कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे. महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करत असून त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली आहे. हे सुधारण कधी हेच समजत नसल्याची खोचक टिका या अग्रलेखून करण्यात आली आहे.

Protected Content