पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) शिवारात मोहाडी जंगलाजवळ असलेल्या अशोक पितांबर पाटील यांचे शेतामध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एक वासरु बिबट्याने फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरचा प्रकार अशोक पाटील हे शेतात गेले असता त्यांच्या निदर्शनास आला. तद्नंतर घटनास्थळी खेडगाव (नंदीचे) येथील उपसरपंच अभिमान बाविस्कर, नुकसानग्रस्त शेतकरी अशोक पितांबर पाटील, बापू ढमाले, वामन संतोष पाटील, दिपक विश्वनाथ पाटील, अशोक पाटील, पोलीस पाटील चंद्रशेखर पाटील, पिंटू गुजर, दत्तू ढमाले उपस्थित होते. वन विभागाचे कर्मचारी राहुल कोळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी संबंधित कार्यालयाला अहवाल पाठवणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे.खेडगाव (नंदीचे) परिसरात आठवड्याभरात तिसरा हल्ला असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडुन जोर धरु लागली आहे.