मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे शाळकरी मुलांसाठी बसेस उपलब्ध करण्यात आली. दरम्यान, दैनदीन बसेस वेळेवर नसल्यामुळे बस स्थानकावर दिवसभर लहान शाळकरी मुले स्थानकावर बसून राहावे लागत असून आज ह्या समस्येतून सुटका झाली आहे.
संपूर्ण तालुक्याभरातून पहिली ते दहावी आणि दहावी ते पदवीचे शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी बसने दररोज ये-जा करीत असतात. परंतु काही दिवसांपासून बसेस वेळेवर नसल्यामुळे बस स्थानकावर दिवसभर लहान शाळकरी मुले स्थानकावर बसलेली असतात. हे नित्याचे झाले होते आज सुद्धा शेकडो शाळकरी मुली आणि मुले बस स्थानकात बस नसल्यामुळे तात्काळत उभी आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांना युवा सेनेचे कार्यकर्ते दीपक घुले यांनी कळवले असता लागलीच पवन सोनवणे यांनी दखल घेत बस स्थानकात येऊन सर्व लहान लहान शाळकरी मुलांना सोबत घेऊन थेट बस डेपो गाठून डेपो मॅनेजर संदीप साठे तसेच ए टी आय अनिल बावस्कर यांच्याशी चर्चा केली असता आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे आम्ही बसेस वेळेवर सोडू शकत नाही. परंतु असे जर परत मुलांना त्रास झाला तर शिवसेना स्टाईलने डी एन यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांनी दिला आहे. तसेच तात्काळ शाळकरी मुलांसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या. यावेळी शाळकरी मुलांनी पवन सोनवणे यांचे आभार मानले त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.