भडगाव पोलिसांना आता ग्रामसुरक्षा दलासह पोलीस मित्रांची मदत

भडगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरी तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी आता ग्राम संरक्षक दल स्थापन केली आहेत. या ग्राम संरक्षण दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागात तसेच शहरी भागात गस्त घालण्यात येणार आहे.

भडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुमारे ६० गावे आहेत. पोलीस कर्मचारी संख्या त्याहीपेक्षा कमी असल्याने ग्रामीण भागातील पशुधन, शेतातील ठिबक नळ्या, विहिरीच्या मोटरी, मोटरसायकली, गुरे चोरीचे प्रमाण वाढले होते. म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन राज्यातील ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल तसेच शहरी भागात पोलीस मित्र तयार करण्यात आले आहेत. भडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील आतापावेतो गोंडगाव, वडगाव सतीचे, महिंदळे, बांबरुड, वडजी, बात्सर, लोण पिराचे, भातखंडे, गिरड, मांडकी, वलवाडी, पिंप्रिहाट, पिचर्डे, निंभोरा, तांदुळवाडी, पांढरद, नालबंदी, पळासखेडा, कोळगाव, वाडे, आमडदे, गुढे, कजगाव, भडगाव या २५ गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल, पोलिस मित्रांची पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक ऊतेकर यांनी स्थापना केली आहे. ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना चांगलाच आळा बसणार आहे. याबाबत ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व पोलिस मित्रांची तसेच सर्व पोलीस पाटील बांधवांची पोलीस स्टेशनला मिटिंग घेण्यात आली आहे. मीटिंग दरम्यान त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आले आहेत. ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व पोलीस मित्र यांना पोलीस स्टेशनच्या वतीने ओळखपत्र व इतर साहित्य देण्यात आले आहे. सदर ग्रामसुरक्षा दल स्थापन करणेकामी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक ऊतेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे गोपनीय पोलिस कर्मचारी विलास पाटील, स्वप्नील चव्हाण तसेच संबंधित पोलीस पाटील बांधवांनी विशेष काम पाहिले आहे.

Protected Content