रावेर (प्रतिनिधी) दुष्काळ असल्याने ग्राम पंचायतींनी पाण्याचे नियोजन करा, वृक्ष लागवडीसाठी दिलेले उद्दीष्ट वेळेत पूर्ण करा, ‘मनरेगा’च्या माध्यमातुन शोष खड्डे खोदा, तालुक्यात टँकरची गरज भासल्यास तहसीलदारांना कळवा, अशा सूचना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी आज येथे उपस्थित अधिका-यांना दिल्या. आढावा बैठकीसाठी सीईओ पाटील रावेरला आले होते.
यावेळी त्यांनी संपूर्ण राज्यात प्रथमच केलेल्या ९६० मीटर विटवा-निंबोल संपूर्ण कॉंक्रिटीकरण रस्त्याला भेट दिली. तसेच पाडळसे, चिनावल, विवरे, विटवा, सांगवे आदी ग्राम पंचायतींना सप्राइज भेट देऊन त्यांच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी रावेर पंचायत समितीत सर्व कर्मचा-यांची बैठक घेऊन शौचालय, घरकुल, दुष्काळ, पं.स. कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नव्याने तयार होत असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीची पाहणीही केली. यावेळी गट विकास अधिकारी हबीब तडवी, जि.प. बांधकाम विभागाचे श्री. चोपडेकर, जलसंधारणचे श्री. जाधव, श्री कुलकर्णी, बांधकाम अभियंता पराग पाटील, श्री. महाजन ‘स्वच्छ भारत’चे समाधान निंभोरे, विस्तार अधिकारी श्री. महाले, श्री. सोनवणे आदी कर्मचारी उपस्थितीत होते.
खिरवड भष्ट्राचारप्रकरणी करवाई होणार:- खिरवड ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या सुमारे १७ लाखांच्या भ्रष्ट्राचारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे संकेत खुद्द सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, मी स्वत: या प्रकरणी लक्ष घालतो, याआधी इतकी दिरंगाई का झाली ? याचीही चौकशी करतो, तसेच त्यांनी चौकशी अधिकारी हबीब तडवी यांना या प्रकरणाची माहिती नव्याने जिल्हा परीषदेत पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत.
आदिवासी गावांची पाहणी :- शौचालय, घरकुल, दुष्काळ, पाणी टंचाई आदींची आढावा व पाहणी करण्यासाठी पुढल्या आठवड्यात पुन्हा तालुक्यात येणार असुन शासनाच्या योजना गरीबांपर्यंत पोहचत आहे की नाही ? याचीही शहानिशा करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.