मसाकाच्या तत्वत: मान्यतेला मिळाली अधिकृत मंजुरी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी ७ कोटी रुपयांच्या तत्वत: मान्यतेवर राज्य मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.

मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या साखर मालतारण खाती अपुरा दुरावा (शॉर्ट मार्जिन) आहे. यामुळे जिल्हा बँकेकडून या कारखान्यास कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने शेतकरी व कामगार हितास्तव कारखाना सुरु व्हावा यासाठी सर्वच नेते मंडळी प्रयत्नशील होते. यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मधुकर सहकारी साखर कारखान्याला तत्वतः मान्यता थक हमीपत्र मिळवून देण्यात यश मिळवले होते. संबंधीत थक हमीपत्रावर जिल्हा सहकारी बँक यांनी ७ कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यातून मधुकर सहकारी साखर कारखान्याने ६ कोटी रुपये कर्ज फेड केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या तत्त्वत: मान्यता पत्राला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आज दिलेल्या मंजुरी पत्राला मान्यता ही मागील पत्राची असून नवीन थकहमी पत्र शासनाने अजून दिलेले नाही. यासाठी मधुकर सहकारी साखर कारखाना नवीन थक हमीपत्र घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यात मागील ५ ते ६ वर्षांपासून असलेली दुष्काळी परिस्थिती, साखरेचे कमी झालेले दर, साखर कारखान्यांची हलाखीची आर्थिक स्थिती या पार्श्‍वभूमीवर कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, शेतमजूर व साखर कारखान्यांचे कर्मचारी यांच्या हितासाठी कारखाने सुस्थितीत सुरु ठेवता यावेत, ऊस उत्पादक शेतकर्‍यांची एफआरपीची रक्कम देता यावी, यासाठी नवीन थकहमी पत्र मिळावे या साठी मसाका प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे ही मात्र निश्‍चित.

Add Comment

Protected Content