ब्रेकींग : अडथळे दूर. . .धरणगावात होणार सुरळीत पाणी पुरवठा !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून येथील पाणी प्रश्‍न ज्वलंत बनला असतांना आज जलस्त्रोत केंद्रावरील दोन्ही मोटारींची दुरूस्ती झाल्याने उद्यापासून शहरात सुरळीतपणे पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, धरणगावात सध्या पाणी प्रश्‍न अतिशय बिकट बनला आहे. विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध असतांना देखील तब्बल २० पेक्षा जास्त दिवसानंतर पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अलीकडच्या काळात यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले आहेत. खुद्द पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदासंघातही पाण्याची इतकी मोठी समस्या असल्याने हा मुद्दा खर्‍या अर्थाने ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, यावरून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन केले. यातील खरी समस्या ही तापी नदीला लागून असणार्‍या धावडा येथील जलसंकलन आणि जल शुध्दीकरण केंद्राच्या विद्युत पंपांमध्ये झालेला बिघाड ही होती. यात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण तसेच पुणे येथील कंपनीच्या कर्मचार्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होत. आज दुपारी या प्रयत्नांना यश आले असून दोन्ही पंप दुरूस्त झाले आहेत. यामुळे उद्यापासून आधीप्रमाणेच्या रोटेशन नुसार पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Protected Content