मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर समता पक्षाने दावा ठोकला असून या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर खरा प्रश्न होता तो पक्षाची मालकी आणि चिन्हांचाच ! याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह प्रदान केले. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले. मात्र यात आता एक ट्विस्ट आला आहे.
उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले असले तरी आधी याची मालकी ही समता पक्षाकडे होती. २००४ पर्यंत समता पक्षाच्या उमेदवारांनी याच चिन्हावर निवडणूक लढविली होती. आता यापुढे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष याला वापरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, समता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी याला आक्षेप घेतला आहे. मशाल हे समता पक्षाचे चिन्ह असून ते आम्हालाच वापरण्यासाठी मिळावे अशा मागणीचा तक्रारी अर्ज त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.