पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निपाणे येथील घटनेतील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने पाचोरा शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे १२ सप्टेंबर रोजी एका दलित समाजाच्या महिलेचा अंत्यविधी गावातील स्मशानभूमीमध्ये होवु देण्यास गावातीलच माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील व अन्य १० जणांनी मज्जाव केला होता. या घटनेप्रकरणी मा. जि. प. सदस्य रावसाहेब पाटील यांचेसह १० जणांविरुद्ध १४ सप्टेंबर रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होवून २० दिवस उलटुनही आरोपींना अटक होत नसल्याने अनेक वेळा आंदोलन, निदर्शने व निवेदन देवुन ही न्याय मिळत नाही.
आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजता आॅल इंडिया पँथर सेना जळगांव जिल्हा युनिट तर्फे आॅल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या उपस्थितीत शहरातील जारगाव चौफुलीवरुन हनुमान नगर, बस स्टॅण्डरोड, शिवाजी नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसिल कार्यालया पर्यंत जोरदार घोषणाबाजी करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आॅल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार,समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, अॅड. अविनाश भालेराव, प्रविण ब्राम्हणे, सुनिल शिंदे, ए. बी. अहिरे, भालचंद्र ब्राह्मणे, विनोद अहिरे सह सखल आंबेडकरी समाज, पुरोगामी संघटना, पिडीत महिलेचा परिवारासह मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या.