जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ‘प्रत्येक माध्यमांची स्वतंत्र अशी भाषा आहे. माध्यमात प्रादेशिक भाषेचा प्रभाव वाढत असल्याने ती अधिक लोकाभिमुख होत आहे. प्रादेशिक बोली भाषेचा प्रभावीपणे वापर माध्यमातील आशयात होत असल्याने सामान्यांचे प्रतिबिंब हे माध्यमांमध्ये उमटत असते.’ परिणामी माध्यमांची भाषा ही प्रदेश आणि काळानुरूप बदलत असल्याचा सूर वक्त्यांच्या मनोगतातून उमटला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे आज मंगळवार दि. २७ रोजी ‘माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या‘ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. वेबसंवादात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख तथा सवांद माध्यमतज्ज्ञ डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी तथा नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.बबन नाखले आणि मुंबई येथील लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे यांच्यासह मुख्य आयोजक जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर यांच्यासह डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे उपस्थित होते.
यावेळी डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले की, “माध्यमांची भाषा व माध्यमातील भाषा या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना असून माध्यमांचे स्वरुप बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमातील भाषा ही व्यक्तीगत नसून ती संस्थागत आहे.” म्हणजेच मालकाची भाषा आहे. माध्यमांचे स्वरुप बदलत असल्याने माध्यम साक्षरता वाढविणे गरजेचे असल्याचेही डॉ.जोशी यांनी स्पष्ट केले.
डॉ.बबन नाखले म्हणाले की, “माहिती, मनोरंजन आणि शिक्षण हे माध्यमांचे वैशिष्ट्ये असून माध्यमांची भाषा सतत बदलत असते. बदल हा माणसामध्ये, तंत्रज्ञानामध्ये आणि विचारामध्ये होवू शकतो. आकाशवाणीसाठी संहिता लेखन करताना भाषा सोपी आणि सुटसुटीत असायला हवी.” असे डॉ.नाखले यांनी यावेळी सांगितले.
आशिष जाधव म्हणाले की, “माध्यमे लक्षात घेवून भाषेचा वापर केला जातो. भाषा कशी असावी, यापेक्षा ती भाषा कशी वापरता हे महत्वाचे आहे. भाषा प्रभावी असली पाहिजे, भाषेची शुध्दता जपली गेली पाहिजे. डिजिटल मीडियामध्ये भाषेपेक्षाही आशयाला महत्व आहे. त्यामुळे कधीकधी माध्यमांमध्ये विशिष्ट शब्दांचाही वापर केला जातो.” साधी, सरळ आणि सोपी भाषा ही संवादासाठी अधिक प्रभावी ठरत असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत प्रा.डॉ. अनिल चिकाटे यांनी केले. प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर यांनी ‘माध्यमांची भाषा, स्वरुप आणि बदल’ याविषयी विवेचन करून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. वक्त्यांचा परिचय डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कोमल पाटील हीने केले तर आभार दिक्षिता देशमुख या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना चौधरी, प्रल्हाद लोहार, प्रकाश सपकाळे यांनी परिश्रम घेतले.