शेती हे शास्त्र, ते समजून घेऊन त्याचे शास्त्रज्ञ बनावे ; पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) शेती हे शास्त्र आहे, ज्यांना शेतीचे तंत्र उमगते त्यांचे उत्पादन निश्चित वाढते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरुन शेतीचे तंत्र समजून घेऊन त्याचे शास्त्रज्ञ बनावे. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज कृषि दिनी केले.

येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात हरितक्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा कृषि विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील या होत्या. तर व्यासपीठावर उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर आदि उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासन शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी गटशेतीला प्राधान्य देऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पोकरा योजनेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग होत आहे. त्याचबरोबर आत्मा योजनेतूनही अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारचे लाभ देण्यात येत आहे. याचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या विकासासाठी लाभ घ्यावा. शेतीला लागणारे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे याकरीता जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज, निम्न तापी प्रकल्प प्राधान्याने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याकरीता लागणारी बीज मिळावी यासाठी प्रलंबित असलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याच्या सुचना वीज वितरण कंपनीस देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सौर उर्जेवर चालणारे जास्तीत जास्त पंप जिल्ह्याला मिळावे यासाठीही प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी परंपरागत शेती न करता शेती हे शास्त्र आहे त्यांचे तंत्र समजून घेऊन आधुनिक प्रयोग करावेत. शेतीला पुरक व्यवसाय सुरु करावेत. जेणेकरुन आपले उत्पन्न वाढण्यास मदत होईल असे सांगून शेतकरी आणि वारकरी यांचे घनिष्ठ नाते आहे. आषाढी एकादशी आणि कृषि दिन एकाच दिवशी येणे हाही एक योगायोगच असून कोरोनाचे संकट जावू दे, चांगला पाऊस पडू दे आणि माझ्या शेतकरी राजाला चांगले बळ दे. अशी विनंती पांडूरंगाच्या चरणी करुन जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषिदिनाच्या शुभेच्छाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.

कार्यक्रमाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच 1 ते 7 जुलै दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या कृषि संजिवनी सप्ताहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी पोकरा योजनेचा लाभ घेऊन नवनवीन प्रयोग करणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टिन्सिंगचे पालन व्हावे याकरीता कृषि विभागामार्फत शेतकरी गटातर्फे खते, बी-बीयाणे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना कृषि दिनाचा शुभेच्छा दिल्यात.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, व या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील शेतकरी, पदाधिकारी व नागरीकांना घेता यावा, याकरीता या कार्यक्रमाचे गुगल मिटद्वारे थेट प्रसारण करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले.

यावेळी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डिगंबर लोखंडे, बी. ए. बोटे, कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, मधुकर चौधरी, हेमंत बाहेती, संजय पवार यांच्यासह कृषि विभाग व जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व निवडक शेतकरी उपस्थित होते.

Protected Content