जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीतील एकूण २६ लाख ३६ हजार ३०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवार, दि.१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, “जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विकास कामांसाठी सन २०१७ ते २०२१ दरम्यान शासनाकडून स्मार्ट ग्राम योजनेसाठी ११ लाख ८४ हजार आणि चौदाव्या वित्त आयोगात योजनेअंतर्गत १४ लाख ५२ हजार ३०० असा एकूण २६ हजार ३६ हजार ३०० मंजूर झाले होते.
दरम्यान तत्कालीन ग्रामसेवक बबन राजू वाघ आणि सरपंच उखा किसन मोरे यांनी संगणमत करून गावातील विकास कामांसाठी मंजूर असलेले पैसे काढून खोटे व बनावट दस्तावेज तयार करून शासनाची २६ लाख ३६ हजार ३०० रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.
या संदर्भात जळगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून तत्कालीन ग्रामसेवक बबन राजू वाघ आणि सरपंच उखा किसन मोरे यांच्या विरोधात शासनाच्या निधीचा अपहर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.