शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथून मुस्लीम समाजबांधवांतर्फे १५१ दुचाकींची भव्य रॅली काढण्यात आली.
शेंदुर्णी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुस्लीम समाज बांधवांतर्फे १५१ मोटार सायकल वरून तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी समाजातील तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहण्यात आला. यात सर्वात पुढे चारचाकी वर बॅनर व देशभक्तीपर गीते त्यामागे प्रत्येक मोटार सायकलवर मोटारसायकलस्वार सोबत ध्वज धरलेला एक युवक असे रॅलीचे स्वरूप होते. याप्रसंगी जिंदाबाद जिंदाबाद हमारा हिंदुस्थान जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, भारत की आझादी जिंदाबाद, महात्मा गांधी की जय अश्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर अक्षरश: दुमदुमला.
शेंदुर्णी पोलीस दुरक्षेत्रा पासून रॅलीस सुरुवात करण्यात येऊन शहरातील मुख्य मार्गाने जाऊन पहूर दर्जात रॅली विसर्जित करण्यात आली. यावेळी गावात नागरिकांनी रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले. समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी या भव्य दुचाकी रॅलीचे स्वागत केले.