स्पीड ब्रेकरने घेतला महिलेचा बळी : दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळल्याने रस्त्यावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रमोद दिनकर बडगुजर (रा. सुप्रीम कॉलनी, एम. आय. डी. सी., जळगांव) हे पिंपळगाव (हरेश्वर) येथील आपल्या शालकाच्या मुलाचा नवस असल्याने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आई सुशिलाबाई दिनकर बडगुजर (वय – ६४) यांना घेऊन एम. एच. १९ – डी. बी. ११८८या क्रमांकाच्या दुचाकीवरून आज सकाळी निघाले होते.

दरम्यान सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारी गावानजीक त्यांची मोटरसायकल ही स्पिड ब्रेकरवर आदळली असता मागे बसलेल्या सुशिलाबाई बडगुजर ह्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने सुशिलाबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुशिलाबाई बडगुजर यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सुशिलाबाई बडगुजर यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे.

Protected Content