जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर विविध उपक्रमाद्वारे साजरा होत असून त्याच अनुषंगाने ‘माझी वसुंधरा’ कार्यक्रमाच्या अंतर्गत मेहरूण तलाव येथील पक्षी घराजवळ जळगाव शहर महानगरपालिका जळगाव व मराठी प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्ष लागवड करण्यात आली.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहा. आयुक्त श्याम गोसावी, विजय वाणी, जमील देशपांडे, नगरसेवक तसेच महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाची माहिती देण्यात आली तसेच महापौर व आयुक्त यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित मिळून मेहरून तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड केली.
वृक्ष लागवडीसोबतच स्थानिक कलाकारांनी देशभक्तीपर गाणी सादर केलीत, सदर गायनात महापौर तसेच आयुक्त यांनी देखील सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे संपूर्ण जळगाव शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा अभियान अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.