जळगाव-राहूल शिरसाळे (स्पेशल रिपोर्ट ) | आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेच्या शिंदे गटाचे ज्येष्ठ सदस्य गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. एका साध्या पानटपरी चालकापासून ते थेट मंत्री आणि महत्वाचे म्हणजे अमोघ वक्ता म्हणून परिस्थितीशी दोन हात करून त्यांची वाटचाल झालेली आहे. जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची गाथा.
सर्वसाधारण कुटुंबात जन्म
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे अतिशय साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी आपल्या अविश्रांत परिश्रमासह जनसेवेच्या बळावर राज्याच्या राजकारणात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे नाव येताच खान्देशची मुलूखमैदानी तोफ ही उपाधी आपोआपच डोळ्यासमोर उभी राहते. अगदी गल्लीबोळात, वाड्या-वस्त्यांवर, खेडोपाडीच्या लहान-सहान बैठकांपासून ते मुंबईच्या शिवाजी पार्कवरील विराट सभांपर्यंत त्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याने गाजविल्या आहेत. सभागृहातील त्यांची अनेक भाषणे देखील गाजली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर गुलाबराव पाटील यांना भाषणाची संधी मिळाली असता त्यांनी केलेले सुमारे २० मिनिटांचे भाषण हे तुफान गाजले. या भाषणाने शिंदे गटावरील सर्व आरोप खोडून काढतांना शिवसैनिकांची कुचंबणा त्यांनी विलक्षण प्रखरतेने मांडली.
कारकिर्दीच्या प्रारंभीच दिसली चुणूक
साधारण परिस्थितीमुळे गुलाबराव पाटील यांचे फक्त बारावीपर्यंतच शिक्षण झाले. वाचनाचा छंद आणि नाटके, एकांकीका आदींची आवड असल्याने ते यातच रमले. ऐशीच्या दशकातील धगधगत्या युगात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन ते शिवसैनिक बनले. त्यांनीच सांगितल्यानुसार १९८४ साली म्हणजेच जेमतेम विशीच्या उंबरठ्यावर असतांनाच ते शिवसेनेत कार्यरत झाले. अंगभूत वक्तृत्वकला, धाडसी स्वभाव, अनोखे संघटन कौशल्य आणि अर्थातच तीक्ष्ण विनोदबुध्दीमुळे ते तत्कालीन ज्येष्ठ शिवसैनिकांच्या नजरेत न भरल्यास नवल ! अस्सल गावरान शैलीत शिवसेनेचे विचार प्रखरतेने मांडणारा सळसळत्या रक्ताचा हा शिवसैनिक वेगाने आगेकूच करू लागली.
आकस्मीकपणे मिळाले विधानसभेचे तिकिट
१९९२ साली तत्कालीन एरंडोल पंचायत समितीत सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. याच वर्षी ते कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून निवडून गेले. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून १९९५ साली शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देखील त्यांना मिळाली. १९९७ साली त्यांनी जिल्हा परिषदेत एंट्री केली. यात पहिल्यांदाच त्यांना कृषी सभापतीपदाची संधी देखील मिळाली. दरम्यान १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. तत्कालीन एरंडोल विधानसभेत शिवसेनेने १९९० सालीच हरीभाऊ महाजन यांच्या रूपाने खाते उघडले होते. मात्र ते छगन भुजबळ यांच्या सोबत बाहेर पडल्याने शिवसेनेला येथे धक्का बसला होता. १९९५ साली हरीभाऊ महाजन यांना जनता दलाच्या महेंद्रसिंग पाटलांनी आसमान दाखविले. यानंतर त्यांनी तत्कालीन युती सरकारला पाठींबा देखील दिला होता. साहजीकच महेंद्रसिंग पाटील यांनी ९९ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी अशी बाळासाहेब ठाकरे यांची अपेक्षा होती. महेंद्रबापूंनी याला नकार दिल्यानंतर याची संधी गुलाबराव पाटील यांना मिळाली. आणि यानंतर काय झाले ? ते सर्वांनी पाहिले आहे.
पराजयातून घेतला धडा !
गुलाबभाऊ पाटील यांनी १९९९च्या विधानसभा निवडणुकीत महेंद्रसिंग पाटील यांनाच पराभूत केले. गुलाबभाऊंना ४४७११ तर महेंद्रबापूंना ४०६२१ मते मिळालीत. २००४ साली या दोघांमध्येच पुन्हा मुकाबला झाला. यात गुलाबभाऊंना ६८७६७ तर बापूंना ५७४२९ मते मिळाली. पुढील म्हणजे २००९ विधानसभा निवडणुकीत एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. यात धरणगाव तालुका आणि जळगाव शहर वगळता तालुका यांचा जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आला. यात नवीन भाग जोडला गेला. तसेच तिरंगी लढतीतील फाटाफुटीचा फटका त्यांना बसला आणि यात ६६९९४ मते मिळवूनही गुलाबभाऊ पराभूत झाले. तर ७१५५६ मते मिळवून गुलाबराव देवकर यांनी विजय संपादन केला. या पराभवाचे खचून न जाता गुलाबभाऊंनी दुसर्या दिवसापासून पुन्हा एकदा मतदारसंघात कायम संपर्क राखला. याचे फळ त्यांना पुढील म्हणजे २०१४ सालच्या निवडणुकीत मिळाले. तेव्हा भाऊंनी ८४०२० मते मिळवून तब्बल ३१३३७ मताधिक्याने देवकर यांना पराभूत केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यात गुलाबराव पाटील यांना तब्बल १०५७९५ मते तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष चंद्रशेखर अत्तरदे यांना ५९०६६ मते मिळाली. या निवडणुकीत गुलाबभाऊ हे तब्बल ४६७२९ मतांच्या जबरदस्त लीडने विजयी झाले.
मंत्रीपदाची संधी
गुलाबराव पाटील यांना २००९ सालीच शिवसेनेने उपनेतेपदावर नियुक्त केले होते. येथूनच राज्यभरात ठिकठिकाणच्या त्यांच्या भाषणांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. दरम्यान, जुलै २०१६ मध्ये त्यांना पहिल्यांदा सहकार राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. तर त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देखील आली. २०१९ साली महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली. हे खाते तसेच जळगावच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. आणि यानंतर आज अर्थात ९ ऑगस्ट २०२२ रोजी गुलाबराव पाटील हे तिसर्यांदा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची ही दुसरी टर्म असणार आहे.
जनतेशी कायम संपर्क
गुलाबभाऊ पाटील यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीत त्यांच्या अफाट व कायम राखलेल्या जनसंपर्काचा मोठा वाटा आहे. अगदी कॅबिनेट मंत्री असतांनाही त्यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी जुडलेली नाळ कायम राखली आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही त्यांच्याच भाषेत बोलायचे तर त्यांची ओपीडी ही कायम सुरू असते. आपण दिवसातून किमान पाचशे-हजार लोकांना भेटतो, त्यांची कामे करतो, अगदी ४६-४७ अंश तापमानात मतदारसंघातील अनेक विवाहांना उपस्थिती देतो असे गुलाबराव पाटलांनी विधानसभेतील त्या गाजलेला भाषणात सांगितले आहे. मात्र फक्त लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणे इतकेच ते करत नाहीत. तर आजवरच्या वाटचालीत त्यांनी विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. विशेष करून गेल्या अडीच वर्षात जळगाव ग्रामीणमध्ये भरीव कामे करून त्यांनी जनतेची मने जिंकली आहेत. आधी विरोधी पक्षात असतांना शिंगाडा मोर्चा काढणारे, प्रशासनाला धारेवर धरणारे गुलाबराव पाटील हे सत्तेत आल्यानंतर कुशल प्रशासकाच्या भूमिकेतही त्याच तडफेने काम करत असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. आपल्या मतदारसंघात कामे करतांना त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील कामांना पक्षीय भेद न पाहता गती दिल्याचेही लक्षात घेण्याजोगे आहे. यात जळगाव महापालिकेला डीपीडीसीतून दिलेल्या विक्रमी निधीपासून ते जिल्ह्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना गती दिल्याचा येथे सहज उल्लेख करता येईल.
अफलातून सोशल इंजिनिअरिंग
आपल्या मतदारसंघात स्वत: अल्पसंख्याक समुदायाचे घटक असतांनाही गुलाबभाऊंनी अठरापगड जातींना सोबत घेऊन यशस्वी वाटचाल केली आहे. २०१६ च्या धरणगाव येथील लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या निष्ठावंत मुस्लीम शिवसैनिकाला या पदावर थेट जनतेतून निवडून आणले होते. तर खुल्या जागेवर आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी देण्याचे कामही त्यांनी केले आहे. कोणताही भेद न बाळगता त्यांनी वाटचाल केली असून आज ते पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदी आरूढ झाले आहेत. गुलाबभाऊंना भावी वाटचालीसाठी लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा ! त्यांच्या हातून जास्तीत जास्त जनसेवेची कामे होवोत हीच अपेक्षा.