मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील! अशा शब्दांमध्ये आज शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेचे कार्यकारी संपादक संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर दैनिक सामना मधील अग्रलेखांमधून नेमके कोणते विचार येणार ? याबाबत उत्सुकता लागली होती. या पार्श्वभूमिवर, आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजला टार्गेट केले आहे. यात म्हटले आहे की, राऊत यांच्यावरील कारवाई आकसाने, राजकीय सूडापोटीच करण्यात आली आहे. मुळात कायदा व नियम या देशात राहिलाच नव्हता, पण आता राज्यघटना, लोकशाही वगैरे शब्दांचेही रोज हत्याकांड होत असल्याची टीका यात करण्यात आली आहे.
यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ‘ईडी’ला घाबरून पळ कोणी काढला व दिल्लीत जाऊन कसे कोण शरणागत झाले हे देशाने पाहिले असल्याचा टोला यात मारण्यात आला आहे.