काबूल-वृत्तसंस्था | कुख्यात ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी हा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला असून लादेनच्या खात्म्या नंतर हे दहशतवादी लढाईला मिळालेले सर्वात मोठे यश मानले जात आहे.
‘अल-कायदा’ या अतिशय भयंकर अशा दहशतवादी संस्थेने जगातील अनेक देशांमध्ये दहशतवादी कृत्यांच्या माध्यमातून तेथील सरकारांचा थरकाप उडविली होता. या संघटनेचा प्रमुख नेता ओसामा बीन लादेन याला अमेरिकन सैन्याच्या खास पथकाने कंठस्नान घातले होते. लादेन नंतर या संघटनेतील अन्य खतरनाक नेत्यांना एक-एक करून टिपले जात होते. मात्र संघटनेची धुरा सांभाळणारा जवाहिरी Ayman al-Zawahiri हा मात्र अमेरिकेच्या हातावर नेहमी तुरी देत होता. अनेकदा तो मेल्याची अफवा उठायची, तर काही दिवसांनीच तो जीवंत असल्याचे पुरावे समोर येत असत. तो नेमका कुठे दडून बसलाय याची माहिती देखील कुणाला नव्हती.
या पार्श्वभूमिवर, काबूल शहरात रविवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात जवाहिरी ठार झाल्याची माहिती अमेरिकेतर्फे देण्यात आली असून नंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. काबूल शहरात एका ड्रोनच्या माध्यमातून भर वस्तीत असलेल्या घरावर रॉकेट हल्ला करण्यात आला. यात जवाहिरीा खात्मा झाल्याचे बायडेन म्हणाले. हा हल्ला अतिशय अचूक निशाणा धरून करण्यात आल्याने इतर कुणाला इजा झाली नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
अयमान अल-जवाहिरी हा २००१ सालच्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी कृत्यांमधील मास्टर माईंड मानला जात होता. या प्रामुख्याने येमेन, केनिया, टांझानिया आदी देशांमधील अमेरिकन वकिलाती व लष्करी तळावरील हल्ल्यात त्याचा हात होता. यामुळे जवाहिरीला मारून न्याय झाल्याची भावना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केली आहे.