नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी व आरसीपी सिंग यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्तार अब्बास नकवी आणि आरसीपी सिंग यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी गुरूवारी संपत आहे. या पार्श्वभूमिवर, या दोन्ही मान्यवरांनी आपापल्या पदांचे राजीनामे पंतप्रधानांकडे सोपविले आहेत. याआधी पंतप्रधानांनी मुख्तार अब्बास नकवी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना आगामी काळात उपराष्ट्रपदीपदासाठी उमेदवारी मिळू शकते. अन्यथा, त्यांना कोणत्याही राज्याच्या राज्यपालपदी पाठविले जाऊ शकते असे मानले जात आहे.
दरम्यान, या दोन खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर कॅबिनेटच्या खात्यांमध्ये फेरबसल होऊन मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो. यात महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून त्यांच्याकडे येणार्या दोघांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून राज्यात सत्तांतर घडवून आणले. यानंतर आता केंद्रीय राजकारणातील महत्वाचा घटक असणार्या खासदारांमध्ये फुटीची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहेत. माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तर आज शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत येणार असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमिवर, पक्षातर्फे सावध पवित्रा घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.