मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची आज जवळपास साडेनऊ तास कसून चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांनी आवश्यकता भासल्यास ईडीकडे आपण चौकशीसाठी पुन्हा जाऊ असे वक्तव्य केले.
एकीकडे राज्यात सत्ता संघर्ष सुरू असतांना दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ईडीने नोटीस बजावली होती. पहिल्या नोटीसीनंतर ते चौकशीसाठी गेले नाहीत. तर दुसर्या नोटीशीनंतर ते दुपारी बाराच्या सुमारास ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी गेले. सुमारे साडेनऊ तासानंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. या कालावधीत त्यांची अतिशय कसून चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, ईडीने आज पत्राचाळ विषयाशी संबंधीत माझी चौकशी केली. यात त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी दिले. यातून त्यांचे समाधान झाल्याचे मला वाटते. आपण चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केले आहे. ईडीला आवश्यकता भासल्यास आपण पुन्हा चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल या वाक्याचा वापर केला हे विशेष.