जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नासाठी ८ लाख तर पेट्रोलपंपाच्या व्यवहारात मॅनेजरने अफरातफर करुन मालकाची तब्बल १२ लाख १७ हजार ७९५ रुपयात फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, पैसे मागितले असता पेट्रोलपंप मालकाला धमकी दिल्याचा प्रकार शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गिरणा पाटबंधारे कॉलनीतील संतोष काशीनाथ वसतकर (वय-४४) हे शेतकरी असून त्यांच्याकडे रावेर तालुक्यातील पाल येथे जे. एस. तडवी ऍन्स सन्स नावाने पेट्रोल पंप आहेत. पाल येथील पेट्रोल पंप दुसर्याला चालविण्यास दिला असून याठिकाणी मच्छींद्रनाथ तुकाराम कातरे रा. लोणी बहादरपुर ता. जि. बुर्हाणपुर (मध्यप्रदेश) हे मॅनेजर म्हणून कामाला होते. मच्छींद्रनाथ कातरे हे पेट्रोलपंपाचा दैनंदिन भरणासह संपुर्ण व्यवहारांचा हिशोब देत असल्याने मालकाचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. कातरे यांच्या पुतणीचे लग्न असल्याने ३ एप्रिल रोजी त्याने संतोष वसतकर यांच्याकड ८ लाख रुपये मागितले होते. परंतु वसतकर यांनी तुला येवढे पैसे कसे काय देवू असे म्हटले असता, त्यांनी माझ्या भावाचे पैसे येणार असून तेव्हा तुम्हाला देवून टाकू असे त्याने सांगितले. यावेळी वसतरक यांनी त्याला स्टॅम्प करुन दे असे सांगताच मच्छींद्र याचा भाऊ राजाराम तुकाराम कातरे यांनी स्टॅम्पची गरज नसून त्यांनी आठ लाख रुपयांचे दोन धनादेश सुरक्षीतेपोटे त्यांना दिले होते. महिनाभरानंतर मच्छींद्र हा पैसे परत करणार होता. परंतु त्याला बर्याचदा पैसे मागितले असल्याने तो आज देतो उद्या देतो असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. यावेळी पेट्रोलपंप मालक यांना कातरे यांच्या व्यवहारावर संशय येवू लागल्याने त्यांनी पाल येथील पेट्रोल पंपाचे दप्तर घरी नेवून त्यांनी दप्तराची तपासणी केली.
दप्तर तपासणीत मॅनेजर मच्छींद्रनाथ कातरे याने पेट्रोलपंपाच्या हिशोबातील ओपनिंग व क्लोजींग बॅलन्समध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तर पेट्रोल पंपावरील मिटर रिडींगमध्ये फेरफार करुन व डिझेलची विक्री कमी दाखवून त्याने त्याचा भाऊ प्रविण कातरे याला सांगून सुमारे ४ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
रविवारी २६ जून रोजी सायंकाळी मॅनेजर मच्छींद्र कातरे, राजाराम कातरे, प्रवीण कातरे, तेली हे गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ आले होते. याठिकणी पेट्रोलपंप मालक संतोष वसतकर यांनी कातरे यांनी घेतलेले ८ लाख रुपये व पेट्रोलपंपाच्या हिशोबात केलेल्या अपहाराबाबत विचारणा केली. यावर कातरे यांने वसतकर यांना उडवाउडवीची उत्तरे देत तुमच्याकडून काय होईल ते करुन घ्या मी पैसे देणार नाही अशी धमकी देत तेथून निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच संतोष वसतकर यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मॅनेजर मच्छींद्र कातरे त्यांचा भाऊ राजाराम कातरे व प्रवीण कातरे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार हे करीत आहे.