गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदारांना घेवून केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारण सध्या इमोशनल वळणावर आले आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद दिली. याला उत्तर म्हणून शिंदे समर्थक आमदारांनी थेट पक्षप्रमुख यांना एक भावनिक पत्र लिहून पाठविले आहे.
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना आमदारांची अडचणी झाल्याचा आरोपी करण्यात आला आहे. शिवाय वर्षा बंगल्यावर स्वपक्षीय आमदारांना मिळणारी वागणूकीवर बोट ठेवले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी पत्राला सुरूवात केली, त्यात म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षातल्या मुख्यमंत्री म्हणून अनेक अडचणी सांगण्यासाठी वर्षा बंगल्यावर तपासंतास बसावे लागत होते. ते पुढे आपल्या पत्रात म्हणतात, काल वर्षा बंगल्याची दारे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारे गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती, असा थेट आरोप हा शिरसाठ यांनी केला आहे.
पुढे म्हटले आहे की, स्वपक्षीय शिवसेना आमदार असूनही आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यावर बोललेल्या शब्दांची आठवण करून देणारे हे शब्द या पत्रात वापरले आहेत, ते पुढे पत्रात म्हणतात, विधान परिषदेचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. असे म्हणत त्यांनी या पराभवाचं खापरही उद्धव ठाकरेंच्या आजुबाजुच्या लोकांवर फोडलं आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.