जळगाव- जयश्री निकम ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | एकनाथराव खडसे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने त्यांच्या समर्थकांना जून महिन्यातच वसंत ऋतुची अनुभूती आल्याचे दिसून येत आहे. मात्र याच जून महिन्याने त्यांच्या जीवनात भयंकर उत्पात घडवून आणला होता. पहा तारखांच्या अनोख्या योगायोगांबाबतचा स्पेशल रिपोर्ट !
एकनाथराव खडसे यांना भारतीय जनता पक्षाने तिकिट नाकारून त्यांच्या मुलीस उमेदवारी दिली तेव्हाच ते नाराज झाले होते. यानंतर मुलीच्या पराभवात स्वकियांनी घात केल्याचे आढळून आल्याने त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. राष्ट्रवादीने त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये त्यांचे नाव दिले तर ही यादीच अधांतरी लटकून राहिली. या सर्व तणावाच्या वातावरणात अखेर आज विधानपरिषदेत विजय संपादन करून ते पुन्हा एकदा अतिशय सन्मानाने विधीमंडळात जाणार आहे. अर्थात, २० जून हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा मैलाचा टप्पा म्हणून गणाला जाणार आहे. मात्र याच जून महिन्यात त्यांच्या आयुष्यातील एक भयंकर अध्याय सुरू झाला होता.
२०१४ साली एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असून देखील त्यांच्या ऐवजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तथापि, खडसे यांना अतिशय महत्वाची अशी १२ खाती देण्यात आली. याला दोन वर्षे होत नाही तोच मे २०१६ मध्ये त्यांच्यावर एकामागून एक गंभीर आरोप झाले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतक्या अल्प काळात आरोपांच्या फैरी कोणत्याही नेत्यावर झाडण्यात आल्या नव्हत्या. यात भोसरी येथील भूखंडाच्या खरेदीसह कथितरित्या डॉन दाऊद इब्राहिमच्या बायकोशी फोनवरून बोलणे, पीएने मागितलेली कथित लाच, मे महिन्यातील दुष्काळात अहिराणी चित्रपट पाहिला म्हणून टीका आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या जावयाने मॉडीफाय केलेली कार वापरल्याचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. यातून त्यांना अगदी दोन आठवड्यातच म्हणजे ४ जून २०१६ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एका अंधकारमय कालखंडाची नांदी ठरला. यातून त्यांच्यावर बदनामीचे किटाळ, मुलीचा पराभव, ईडीची चौकशी, जावयाला झालेली अटक आदी सर्व बाबींचे आघात त्यांना भोगावे लागले. मात्र बरोबर सुमारे सहा वर्षांनी याच जून महिन्यातील २० तारखेला त्यांच्या आयुष्यात एक टर्नींग पॉईंट आलेला आहे. अजूनही त्यांच्या समोर अनेक आव्हाने असली तरी आता विधानपरिषदेतील हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने यावर मात करण्यासाठी नवीन उमेद मिळाली आहे. अर्थात, जून २०१६ हा त्यांच्यासाठी आघातांची मालिका घेऊन आला असला तरी जून २०२२ हा नवी आशा आणि नवी दिशा घेऊन आला असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.