मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ जुगाराचे दाखल करण्यात आलेले गुन्हे राजकीय दबावातून नोंदविण्यात आल्याचा आरोप करून या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती एका निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, दिनांक ७ जून रोजी पहाटे पोलिसांनी तालुक्यातील पुरनाडा फाटा एका एका जुगार अड्डयावर छापा टाकून रोकडसह एकूण १३ लाख रूपयांचा ऐवज जप्त केला होता. या प्रकरणी जितेंद्र सुभाष पाटील यांच्यासह १५ संशयितांवर कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्यांनी आज एका निवेदनाच्या माध्यमातून आपल्यावर नोंदविण्यात आलेले गुन्हे हे राजकीय दबावातून दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, आम्ही या ठिकाणी झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत नव्हतो, याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. हे पुरावे आम्ही मानवी हक्क आयोग आणि न्यायालयात सादर करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जितेंद्र सुभाष पाटील, अनिल नामदेव कोळी, रवींद्र सदाशिव खिरोळकर आणि संजय गजमल मराठे यांच्या स्वाक्षर्या आहेत.