फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील मंडळाधिकारी यांनी एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला फोनद्वारे धमकी देवून ५० हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंडळाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यावल तालुक्यातील फैजपूर येथील मंडळाधिकारी हनीफ तडवी हे काम पाहतात. गावातील निलेश उर्फ पिंटू मुरलीधर राणे हे राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असून सामाजिक कार्य करतात. बुधवार ४ मे रोजी रात्री १० वाजता मंडळाधिकारी हनीफ तडवी यांनी निलेश राणे यांच्या मोबाईलवर फोन केला व सांगितले की, तुमच्या डंपरने माझ्या गाडीला उडविले आहे. तुम्ही मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मला ५० हजार रूपये द्या नाहीतर मी तुमच्या विरूध्द खोटी कसे दाखल करतो असे सांगून तुला सोडणार नाही असा दम दिला. दरम्यान निलेश राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून मंडळाधिकारी तडवी यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार ५ मे रोजी रात्री ११ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात मंडळाधिकारी हनीफ तडवी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर हे करीत आहे.