जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | ग.स. सोसायटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना यासाठी होणार्या विलंबासाठी ५६ उमेदवारांची भली मोठी मतपत्रीका कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.
मोठा लौकीक असणारी सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था म्हणजेच ग. स. सोसायटीची पंचवार्षीक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा पंचरंगी लढत असल्याने मोठी चुरस पहायला मिळाली. निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेत. तर प्रत्येक पॅनलने आपण निवडून आल्यानंतर अमुक-तमुक करू असे आश्वासने सुध्दा दिली आहेत. मतदान करतांनाच मतदारांना खूप अडचणी आल्याचे दिसून आले होते. विशेष करून बाहेरीला मतदारसंघातल्या ११ जागांसाठी तब्बल ५६ उमेदवार उभे असल्याने एखाद्या वर्तमानपत्राच्या पानापेक्षा ही मतपत्रीका मोठी होती. यामुळे मतदारांची गैरसोय झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपासून ग.स. सोसायटीच्या निवडणुकीचे मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा याच म्हणजे बाहेरीला मतदारसंघाच्या मतपत्रीकांची मोजणी सुरू झाली. अनेक मतदारांना इतक्या मोठ्या मतपत्रीकेवर नेमके कुणाला मतदान करावे हे उमजले नाही. यामुळे प्रत्येक मतपत्रीका पाहून घ्यावी लागत असल्याने मतमोजणीस विलंब लागला. लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत बोलतांना जिल्ह्याचे उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दुपारी दोन वाजता या विभागातील निम्मे म्हणजेच ५० टक्के इतकी मतमोजणी झाल्याची माहिती दिली. अर्थात, मतमोजणीसाठी सर्वात जास्त वेळ याच मतपत्रीकेला लागत असल्याचे दिसून आले असून अतिशय कडक अशा तापमानात मतमोजणी कर्मचार्यांना या जंबो मतपत्रीकेने घाम फोडल्याची चर्चा या परिसरात रंगल्याचेही दिसून आले आहे.