बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महावितरणचे संचालक (वाणिज्य) डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांची थेट भरती प्रक्रियेतून या पदासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ते महावितरणमध्ये मुख्य अभियंता (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते.
वीज वितरणाच्या क्षेत्रातील तज्ञ व विश्लेषक म्हणून ओळख असणारे डॉ. केळे हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते कनिष्ठ अभियंता म्हणून १९९१ मध्ये रुजू झाले. त्यानंतर विविध वरीष्ठ पदांवर त्यांनी चिपळून, गुहागर, खेड, भिवंडी, मुंबई, पेण, नागपूर आदी ठिकाणी काम केले आहे. तर अकोला परिमंडलासह महावितरणच्या मुख्यालयात वितरण व वाणिज्यिक, तांत्रिक आस्थापना, देयके व महसूल या विभागांचे मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे. मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीमध्ये संचालक (तांत्रिक) तसेच वीजपुरवठ्यासाठी अतिशय आहानात्मक असलेल्या त्रिपुरा राज्याच्या विद्युत मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. मुरहरी केळे यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक व साहित्यिक असलेले डॉ. मुरहरी केळे यांचे मराठी व इंग्रजी भाषेमध्ये पुस्तके प्रकाशित झाले आहे. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन देखील केले आहे. सोबतच वीज वितरणासह प्रामुख्याने ‘स्मार्ट मीटर’संबंधी त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने ‘पीएचडी’ पदवी प्रदान केली आहे. तसेच अभियांत्रिकीसह व्यवस्थापन, विधी, वाणिज्य, नियामक, लेखा परीक्षण आदी विषयांमध्ये त्यांनी शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. विद्युत क्षेत्रातील कामाचा त्यांना सुमारे ३२ वर्षांचा अनुभव आहे.