‘संजय राऊत ४२०’ हा सिनेमा लवकरच महाराष्ट्र बघेल ! : राणेंचा हल्लाबोल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत हा राज्यातील सर्वात भ्रष्टाचारी माणूस असून लवकरच ‘संजय राऊत ४२०’ हा सिनेमा महाराष्ट्र बघेल अशा शब्दांमध्ये आमदार नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

काल खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या कारवाईनंतर खासदार राऊत यांनी अतिशय कडवट शब्दांमध्ये भाजपवर टीका केली होती. तसेच सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’ या युध्दनौकेला वाचवण्यासाठी उभारलेल्या निधीचे काय झाले ? असा प्रतिप्रश्‍न उपस्थित केला होता. सोमय्या हे महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर किरीट सोमय्या यांनी हा आरोप फेटाळून लावत संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या कंपन्यांना कोविडच्या काळात कंत्राट कसे मिळालेत ? असा प्रतीप्रश्‍न केला होता.

दरम्यान, आज या सर्व प्रकारांवर आमदार नितेश राणे यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे लवकरच भाजपमध्ये सहभागी होतील. शिवसेनेत फक्त उध्दव आणि आदित्य ठाकरे हेच उरतील असा टोला त्यांनी मारला. तर, राऊत हे भ्रष्टाचाराचे प्रमुख सुत्रधार असून महाराष्ट्रातील जनता लवकरच ‘संजय राऊत ४२०’ हा चित्रपट पाहतील अशी खोचक टीका देखील आमदार राणे यांनी केली.

 

Protected Content